पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा संदेशाचे स्वागत

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या शुभेच्छांचे त्यांचे समपदस्थ इम्रान खान यांनी स्वागत केले आहे. काश्मीरसारख्या महत्त्वाच्या प्रश्नासह इतर मुद्दय़ांवर सर्वकष संवादाची हीच खरी वेळ आहे असे पंतप्रधान  इम्रान खान यांनी म्हटले आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांनी खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र पाठवले होते. त्यात दहशतवादमुक्त दक्षिण आशियाची आवश्यकता प्रदान केली होती. मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले होते की, भारतीय उपखंडातील लोकांनी लोकशाही, शांतता व भरभराट यासाठी संवादाचा मार्ग अनुसरला पाहिजे तसेच दहशतवाद व हिंसाचार मुक्त वातावरण तयार केले पाहिजे.

खान यांनी ट्विट करून मोदी यांच्या संदेशाचे स्वागत करताना म्हटले आहे की, दोन्ही देशात काश्मीरसह सर्वच मुद्दय़ांवर सर्वकष संवाद सुरू होण्याची आवश्यकता आहे. भारताशी संवाद सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे.

दहशतवाद व चर्चा हे दोन्ही एकाचवेळी होऊ शकत नाही असे भारताने पाकिस्तानला अनेकदा बजावले आहे. भारताने गेल्या वर्षी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व पाकिस्तानी समपदस्थ शहा महमूद कुरेशी यांची न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनानिमित्ताने होणारी भेट रद्द केली होती. भारताने शुक्रवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात होणाऱ्या पाकिस्तान दिनाच्या स्वागत समारंभावर बहिष्कार टाकला होता. हुरियतच्या फुटीरतावादी नेत्यांना पाकिस्तानने या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने भारताने हा बहिष्कार टाकला होता. पंतप्रधान नेहमीच बहुतेक सर्व देशांच्या राष्ट्रीय दिनाला शुभेच्छा संदेश पाठवत असतात त्यानुसारच हा संदेश खान यांना पाठवण्यात आला पण तरीही त्यात दहशतवादमुक्त दक्षिण आशियाचा उल्लेख आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.