इम्रान खान यांच्या अमेरिका भेटीबाबत कुरेशी यांचा दावा

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडल्याने पंतप्रधान इम्रान खान यांची पहिलीच अमेरिका भेट अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाली आहे, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला आहे.

खासगी वृत्तवाहिनीला त्यांनी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेला काश्मीर हा संघर्षिबदू असल्याची जाणीव करून देण्यात यश मिळवले असून त्यावर तोडग्याची आवश्यकताही पटवून दिली आहे. ट्रम्प यांनी गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते की, भारत पाकिस्तान यांच्यात काश्मीरच्या मुद्दय़ावर मध्यस्थी करण्यास आपली तयारी आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी व्हाइट हाऊस येथे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली त्यावेळी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची कुठलीही विनंती ट्रम्प यांना ओसाका येथे जी २० परिषदेच्या वेळी चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी केली नव्हती, असे स्पष्टीकरण भारताने नंतर दिले होते.

‘दौरा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी’: अध्यक्ष ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवणे हे इम्रान खान यांचा दौरा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाल्याचे निदर्शक आहे, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. काश्मीर प्रश्नी भारताचा जो हटवादी दृष्टिकोन आहे तो महागात पडणार, आहे कारण काश्मीरमधील परिस्थिती बिघडत चालली आहे, असे ते म्हणाले.