पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इम्रान खान यांचे केवळ भूगोलच नाही तर गणितही कच्चे असल्याचे आता म्हटले आहे. २०१९ मध्ये त्यांनी जपान आणि जर्मनी शेजारी देश आहेत असं सांगणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यावेळी भारताची लोकसंख्या एक अब्ज ३०० कोटी असल्याचे सांगितले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ज्यात ते भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी असल्याचे सांगत आहेत. व्हिडिओमध्ये क्रिकेटचा संदर्भ देत, खान असे म्हणाले की, “क्रिकेटमध्ये दोन विश्वचषक आहेत. एकदिवसीय क्रिकेटचा आणि दुसरा कसोटी क्रिकेटचा. ४० ते ५० लाखांच्या लोकसंख्येने भारताला, ज्यांची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी आहे, त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये हरवले.” इम्रान खान यांनी आयसीसी टेस्ट क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडचे कौतुक करताना त्यांनी हे विधान केले आहे. दरम्यान भारताची लोकसंख्या ही १३९ कोटी आहे.

इम्रान खान यांनी अशा प्रकारची विधानं करण्याची ही पहिलीचं वेळ नाही आहे. याआधी २०१९ मध्ये तेहरानमध्ये इराण दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी जपान आणि जर्मनीला शेजारी देश असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले, पण काही वर्षांनी दोन्ही देशांनी सीमेवर संयुक्त व्यापार करण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी म्हटले होते. यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांची खिल्ली उडवली होती.

जपान हा देश आशिया खंडामध्ये येतो तर जर्मनी युरोपियन देशात येतो आणि दोन देशांमधील अंतर हजारो किमी आहे. इम्रान खान यांच्या भूगोलाच्या ज्ञानासंदर्भातही त्यांच्यावर टीका झाली होती. माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खान यांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका करत इम्रान यांनी पाकिस्तानला हास्याचे पात्र बनवले आहे असे म्हटले होते. याशिवाय, इम्रान खान आणि त्यांच्या मंत्र्यांनी अशी अनेक विधाने दिली आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला लाजेने मान खाली घालावी लागली आहे.