पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आता उपरती झाली असून त्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. सकाळी पाकिस्तानी विमानांचा भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर इम्रान खान यांचा एक रेकॉर्ड केलेला संदेश प्रसारीत झाला. त्यामध्ये इम्रान यांनी भारतासमोर लोटांगण घालणारी भूमिका जाहीर करताना चर्चेचा प्रस्ताव ठेवला.

या टप्प्यावरुन दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढला तर परिस्थिती कुठे जाईल हे सांगता येणार नाही. परिस्थिती माझ्याही आणि नरेंद्र मोदींच्या हातातही राहणार नाही असे इम्रान खान म्हणाले. दोन्ही देशांच्या लष्कराच्या हातात सूत्र गेली तर मृतांचा आकडा वाढेल असे इम्रान म्हणाले. इम्रान यांनी याआधी सुद्धा अनेकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. पण पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना सुरु असताना कुठल्या विषयांवर चर्चा करायची हाच मोठा प्रश्न आहे.

पाकिस्तानातून सातत्याने भारतविरोधी दहशतवादी कारवाया घडवल्या जातात. त्यावरच भारताचा मुख्य आक्षेप आहे. भारताने वारंवार सांगूनही पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. हाफिझ सईद आणि मसूद अझहर पाकिस्तानच्या रस्त्यांवर मोकाट फिरतात, सभा घेतात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही.

आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याचा तिथल्या दहशतवादी संघटनांना पूर्ण पाठिंबा आहे. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश किंवा लष्कर या दोन्ही संघटनांना आयएसआय चालवते. इम्रान खान यांना आयएसआयला वेसण घालून मसूद आणि सईदला तुरुंगात टाकणे जमणार आहे का ? त्यात पाकिस्तानमध्ये लोकशाही मार्गाने कुठलेही सरकार आले तरी भारताबद्दलचे धोरणात्मक निर्णय आयएसआय आणि लष्कराकडूनच घेतले जातात. त्यामुळे इम्रान खान यांच्याबरोबर चर्चा करुन काय साध्य होणार ? हाच प्रश्न आहे.