पाकिस्तानात हळूहळू इम्रान खान यांची लोकप्रियता ढासळू लागली असून लष्कराची प्रशासनावरील पकड अधिक घट्ट होत चालली आहे. पाकिस्तानात अजूनही लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आहे. पण महत्वाच्या पदांवर लष्कराशी संबंधित अधिकारी आहेत. सध्या बारापेक्षा जास्त माजी आणि विद्यमान लष्करी अधिकारी सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. यातील तीन नियुक्त्या मागच्या दोन महिन्यात झाल्या आहेत.

सरकारी मालकीची विमान कंपनी, ऊर्जा कंपनी आणि राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्वाच्या पदांवर लष्कराची माणसे आहेत. मंदावलेली अर्थव्यवस्था, महागाई आणि जवळच्या सहकाऱ्यांची भ्रष्टाचाराप्रकरणी सुरु असलेली चौकशी यामुळे इम्रान खान यांची लोकप्रियता घटली आहे. ब्लूमबर्गने  हे वृत्त दिले आहे.

छोटया-छोटया पक्षांचा पाठिंबा घेऊन इम्रान खान यांनी सरकार बनवले आहे. पाकिस्तानी संसदेत ४६ टक्के जागा त्यांच्या पक्षाकडे आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषकांनुसार इम्रान खान यांच्या पक्षासाठी लष्कराचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. पाकिस्तानात लष्कर सर्वशक्तीमान आहे. सात दशकांच्या इतिहासात बराच काळ पाकिस्तानवर लष्कराने राज्य केले आहे.

२०१८ साली सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांनी नव्या पाकिस्तानची घोषणा केली होती. पाकिस्तानला पूर्णपणे बदलून टाकू असा त्यांचा दावा होता. पण सध्या घोषणा आणि वास्तव यामध्ये बरेच अंतर दिसून येईल. करोना व्हायरसच्या हाताळणीमध्ये लष्कराचे अधिकारी पाकिस्तान सरकारला मदत करत आहेत. माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्या प्रशासनामध्ये काम केलेले लष्कराशी निष्ठावान असलेले १२ जण सध्याच्या सरकारमध्ये विविध पदांवर आहेत. इम्रान खान लष्कराच्या मदतीनेच सत्तेवर आले असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो.