News Flash

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी घेतली शपथ

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बॉर्डरहून लाहोरला पोहचले आहेत

पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. या सोहळ्याला भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांची हजेरी होती. इस्लामाबादमध्ये झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली. तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये इम्रान खान यांना १७६ मते मिळाली. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बॉर्डरहून लाहोरला पोहचले आणि त्यानंतर इस्लामाबाद या ठिकाणी रवाना झाले.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्यानंतर झालेल्या बदलांचे स्वागत केले आहे. आता दोन्ही देशांनी शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलं की, ‘मी एक सदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानमध्ये आलो आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील या अपेक्षेने मी इथे आलो आहे’. माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासहित सुनील गावसकर आणि कपिल देव यांनाही इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी निमंत्रण मिळालं आहे.

इम्रान खान यांनी प्रचारावेळी नवाज  शरीफ यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता. तसेच निवडून आल्यानंतरच्या भाषणात त्यांनी देशामध्ये वेगाने विकास होईल असे आश्वास दिले होते.

पाकिस्तानात २५ जुलैला २७० जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाला सर्वाधिक ११६ जागा मिळाल्या. इम्रान खान यांनी पाच जागांवरून निवडणूक लढवली होती. पाचही जागांवर ते विजयी झाले. पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष शहाबाज शरीफ यांनी ९६ जागा जिंकल्या तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीने ५४ जागा जिंकल्या.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 11:00 am

Web Title: imrankhan takes oath as the prime minister of pakistan
टॅग : Imran Khan
Next Stories
1 शमीला दिलासा, हसीन जहाँची महिना ७ लाख देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली
2 Kerala floods: अॅमेझॉनवर क्लिक करा आणि पाठवा केरळच्या पूरग्रस्तांना मदत
3 Kerala Floods: …तर ५० हजार लोकांचा बळी जाईल, आमदाराचं भावनिक आवाहन
Just Now!
X