मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांना ‘आयटम’ संबोधल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाने या मुद्यावरून आक्रमक होत कमलनाथ यांची निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढावल्यानंतर कमलनाथ यांना माफी देखील मागावी लागली होती. यामुळे त्या मतदारसंघातील निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. ज्यामध्ये काँग्रेस उमेदवाराने इमरती देवी यांचा पराभव केला.

यावरून आता काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला आहे. ”जर इमरती देवी यांना ‘आयटम’ संबोधल्याने काँग्रेसचे नुकसान झाले असेल, तर मग त्यांचा निवडणुकीत पराभव का झाला? इमरती देवी जिलबी बनल्या आहेत.” असं काँग्रेस नेते सज्जनसिंह वर्मा यांनी म्हटलं आहे.

माध्यम प्रतिनिधींनी सज्जनसिंह यांना, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या वक्तव्यामुळे मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवास सामोरं जावं लागलं का? असा प्रश्न विचारला होता. ज्यावर उत्तर देताना त्यांनी वरील विधान केलं आहे.

इमरती देवी मध्य प्रदेशातील डबरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. इमरती देवी यांना त्यांचे नातेवाईक व काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

इमरती देवी यांनी काही दिवसांपूर्वी इतर काही आमदारांबरोबर काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपात प्रवेश केला होता. इमरती देवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं कट्टर समर्थक समजलं जातं. इमरती देवी यांनी काही महिन्यापूर्वीच शिंदे यांच्याविषयीची निष्ठा व्यक्त करताना म्हटलं होतं की “ज्योतिरादित्य शिंदे यांनी विहिरीत उडी घेतली, तर आपणही त्यांच्यासोबत उडी घेऊ,” असं म्हटलं होतं.