आजचा म्हणजे १८ एप्रिल हा दिवस ८९ वर्षांपूर्वी बातम्या नसलेला दिवस ठरला होता. हो तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण खरोखरच बीबीसीने १८ एप्रिल १९३० रोजी आज कोणत्याही बातम्या नाही असं जाहीर केलं होतं. रात्री पावणे नऊ वाजता लागणाऱ्या बातम्यांमध्ये बीबीसीच्या वृत्तनिवेदकाने ‘शुभ संध्याकाळ, आज कोणत्याही बातम्या नाहीत,’ असं जाहीर केलं. त्यानंतर उरलेल्या १५ मिनिटांसाठी बीबीसीने आपल्या प्रेक्षकांना चक्क पियानो ऐकवला.

ब्रिटनमधील हँगहम पॅलेसमधील राजणीच्या हॉलमधून त्यावेळी बीबीसीचे काम चालायचे. ओपेरासाठी बांधण्यात आलेल्या हॉलमधून बीबीसीच्या वायरलेस सर्व्हिसेसचे काम चालायचे. या काळात औपचारिक वृत्तसंस्था, सरकारने केलेल्या घोषणा, सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती हाच बातम्यांचा मुख्य स्त्रोत असायचा. त्यामुळेच बीबीसीकडे येणाऱ्या बातम्यांची संख्या आजच्या तुलनेने खूपच कमी होती. आज एखादी घटना घडल्यानंतर काही मिनिटांमध्ये सोशल नेटवर्किंग, वेबसाईट्स, रेडिओ, वृत्तवाहिन्यांवर त्यासंदर्भातील बातमी झळकते. यापैकी बातमी प्रसारित करण्याची अनेक माध्यमे आज बातम्या देतात. (उदाहणार्थ: ट्विटर किंवा ब्लॉग) मात्र ८९ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी बातम्या देणारे वृत्तनिवेदकांबद्दल लोकांना जास्त माहिती नसायची. ब्रिटनमधील पारंपारिक म्हणजेच कोट आणि शर्ट-पॅण्ट घालूनच त्यांना राजवाड्यातील एका छोट्या भागात असणाऱ्या ऑफिसमध्ये जावे लागायचे. ऑपेरा हॉलमध्ये सादर करण्यात येणाऱ्या संगीत आणि नाट्य कलेप्रती आदर दाखवण्याची ही पद्धत असायची. १९३० नंतर सहा वर्षांनी म्हणजेच १९३६ पहिल्यांदा टिव्हीवरुन बातम्या प्रसारित करण्यात आल्या.