भारतातील लोक फेसबुक व ट्विटरवर जास्त प्रमाणात खाती उघडत असून फेसबुकवर खाते असलेल्या भारतीयांची संख्या ही २०१६ मध्ये सर्वाधिक होणार आहे. सध्या आपल्या देशात सोशल नेटवर्किंगची वाढ सर्वाधिक म्हणजे ३७.४ टक्के इतकी आहे.
इमार्केटियर या संशोधन संस्थेने म्हटले आहे की, भारतात २०१६ मध्ये फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असणार आहे. भारतात सोशल नेटवर्किंगची वाढ सर्वात जास्त म्हणजे ३७.४ टक्के झाली आहे. तर इंडोनेशियात ती २८.७ टक्के , मेक्सिकोत २१.१ टक्के इतकी वाढ नोंदली गेली आहे. या तीनही देशात फेसबुक सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असून इमार्केटियरच्या मते जगात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या १.०२६ अब्ज इतकी होती. अमेरिका हा फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या जास्त असलेला एकमेव देश असून तेथे फेसबुक वापरकर्त्यांची संख्या ही १४६.८ दशलक्ष इतकी होती व भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची मोठी लोकसंख्या लक्षात घेता वाढीचा दर जास्त असून जगात २०१६ पर्यंत भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असणार आहे. फेसबुकवर चीनमध्ये बंदी असल्याने तेथे सोशल नेटवर्किंगमधील फेसबुकचा वापर करणारे कुणी नाही असे इ मार्केटियरने गृहित धरले आहे. सोशल नेटवर्किंगचा वापर करणाऱ्यांची संख्या जगात कमी होत असली तरी ती थांबण्याची मात्र चिन्हे नाहीत. इमार्केटियर कंपनीच्या अंदाजानुसार दर महिन्याला १.६१ अब्ज लोक सोशल नेटवर्किंग साईटवर लॉगइन करतात मग ते कुठलेही साधन वापरून करीत असोत त्यांची संख्या एवढी आहे. २०१२ मध्ये सोशल नेटवर्करची संख्या १४.२ टक्के इतकी वाढली असून पुढील वर्षीही दोन अंकी वाढ अपेक्षित आहे. २०१७ पर्यंत २.३३ अब्ज लोक सोशल नेटवर्किंगचा वापर करीत असतील असे संशोधनात दिसून आले आहे.
एकूण लोकसंख्येचा विचार करता सोशल नेटवर्किंग करणाऱ्यांची संख्या नेदरलँडसमध्ये जास्त असून तेथे ६३.५ टक्के रहिवासी हे सोशल नेटवर्किंगचा वापर करतात. त्याखालोखाल नॉर्वेत त्याचा वापर जास्त असून तेथे ६३.३ टक्के लोक त्याचा वापर करतात. स्वीडन, दक्षिण कोरिया, डेन्मार्ख, अमेरिका, फिनलंड, कॅनडा व इंग्लंड या देशातही जास्तीत जास्त लोक दर महिन्याला सोशल नेटवर्किंग करतात. असे असले तरी सोशल नेटवर्किंगची वाढ ही कमी विकसित देशात वेगाने होत आहे. इमार्केटियर या कंपनीने या अभ्यासात गुणात्मक व संख्यात्मक पद्धतीने माहितीचे विश्लेषण केले आहे.

सोशल नेटवर्किंगची वाढ
* भारत ३७.४ टक्के
*  इंडोनेशिया २८.७ टक्के
*  मेक्सिको २१.१ टक्के
*  अमेरिकेत फेसबुकचा सर्वाधिक वापर
*  कमी विकसित देशात सोशल नेटवर्किंगमध्ये वाढ
*  लोकसंख्येच्या तुलनेत सोशल नेटवर्किंग करणाऱ्यात नेदरलँडस प्रथम तर नार्वे दुसरा