भारतातील रस्ते पादचाऱ्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत. पादचाऱी सुरक्षेसाठी सरकारी पातळीवर विविध उपायोजना करुनही रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या पादचाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. सरकारी आकडेवारीनुसार २०१४ साली १२,३३० पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. २०१७ साली हेच प्रमाण २०,४५७ होते. म्हणजे मागच्यावर्षी दरदिवशी ५६ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

पादचाऱ्यांप्रमाणेच सायकलपटू आणि दुचाकीस्वारांसाठीही रस्ते धोकादायक ठरत आहेत. २०१७ साली रस्ते अपघातात दररोज १३३ दुचाकीस्वार आणि १० सायकलपटूंनी आपले प्राण गमावले. मागच्यावर्षी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ३,५०७ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्याखालोखाल महाराष्ट्रात १८३१ आणि आंध्र प्रदेशमध्ये १३७९ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण तामिळनाडूतच जास्त आहे. तामिळनाडूत ६,३२९ त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ५,६९९ आणि महाराष्ट्रात ४,६५९ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाला. खरंतर पादचाऱ्यांच्या चालण्यासाठी फुटपाथ बनवले आहेत पण बहुतेकदा वाहने उभी करण्यासाठी किंवा फेरीवाल्यांनी या फुटपाथवर अतिक्रमण केलेले असते. शहरी भागात हे चित्र नेहमीच दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथ सोडून रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामध्ये अपघात होण्याची शक्यता जास्त असते.