दहशतवादामध्ये होरपळणाऱ्या काश्मीर खोऱ्यात तीन दशकात काल पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी फुटीरतावाद्यांनी बंदची हाक दिली नव्हती. याआधीच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी काश्मीर खोऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. देशाचे केंद्रीय गृहमंत्री बनल्यानंतर अमित शाह बुधवारी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर आले आहेत.

हुरियत कॉन्फरन्सच्या सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाइज उमर फारुख यांनी अमित शाह यांच्या दौऱ्याच्यावेळी खोऱ्यामधील जनतेला बंद पाळण्याचे आवाहन केले नाही तसेच कुठले वक्तव्यही केले नाही. मागच्या तीन दशकात काश्मीरमध्ये केंद्राचे प्रतिनिधी आल्यानंतर फुटीरतवाद्यांकडून बंद पाळण्यात आला होता. यावेळी असे काही घडले नाही.

तीन फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याच्या विरोधात फुटीरतावाद्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा आणि विकास प्रकल्पांसंबंधी विविध बैठका पार पाडल्या. सुरक्षेसंदर्भातील उच्च स्तरीय बैठकीत त्यांनी सुरक्षा यंत्रणांना दहशतवादी आणि दंगेखोरांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवण्यास सांगितली आहे. अमरनाथ यात्रेकरुंना कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी सुरक्षा दलाच्या प्रमुखांना सर्व आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.