पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे. दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगाना जिल्ह्यातील बरूईपूर भागात शुक्रवारी छापेमारी दरम्यान तब्बल ४१ क्रूड बॉम्ब हस्तगत करण्यात यश आले आहे.

विशेष म्हणजे हे बॉम्ब एका झाडीत आढळून आले होते. बरूईपूर हा तोच भाग आहे जिथं शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह तसेच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी रोड शो केला होता.

यासंदर्भात अधिक माहिती देताना, दक्षिण २४ परगनाचे निवडणूक अधिकारी म्हणाले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचबरोबर प्रकरणाचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे. मात्र आतापर्यंत कुणालाही अटक झालेली नाही. अशाप्रकारे स्फोटकं, हत्यारं सापडणं हे पश्चिम बंगालमध्ये आता नेहमीचंच झालं आहे.

या अगोदर देखील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस अगोदर २६ मार्च रोजी पोलिसांनी २६ क्रुड बॉम्ब हस्तगत केले होते. त्यानंतर २८ मार्च रोजी देखील पोलिसांनी नरेंद्रपूर भागातील एक घरातून ५६ बॉम्ब हस्तगत केले होते. बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. दोन टप्प्यांमधील मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ६ एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ३१ जागांसाठी मतदान होणार आहे.