स्वतःच्या प्रतिष्ठेची आणि चारित्र्याची जपणूक करण्याची प्राथमिक जबाबदारी महिलेची आहे. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पुरुषाने दिलेल्या आश्वासनांना आणि भूलथापांना महिलांनी बळी पडू नये आणि पुढील परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा, असे मत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने नोंदविले. बलात्काराच्या एका प्रकरणात आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत मांडले.
हिमाचल प्रदेशमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी बलदेव राज याने जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती तरलोक सिंग चौहान म्हणाले, सकृतदर्शनी या प्रकरणातील आरोपी आणि पीडित महिला हे एकदम अनोळखी आहेत, असे दिसत नाही. त्या दोघांमध्ये मैत्रीपलीकडचे संबंध होते, हे पुराव्यांवरून स्पष्ट होते आहे. जर पीडित महिलेला माहिती होते की आरोपी विवाहित पुरुष आहे. तर तिने स्वतःला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यापासून रोखायला हवे होते.
शारीरिक संबंध प्रस्थापित करून महिलेची पिळवणूक करू नये, ही पुरुषांचीही नैतिक जबाबदारी आहे. मात्र, कोणासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आणि कोणासोबत नाही, हे महिलेनेच ठरवले पाहिजे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
आपल्याला लग्नाचे आश्वासन देऊन आरोपीने दीड वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्याचे या प्रकरणातील पीडित महिलेने न्यायालयात सांगितले.