अमेरिकेत मेरिलँडमधील कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात घुसून गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली असून जाररॉड वॉरेन रामोस असे त्याचे नाव आहे. मेरीलँड लॉरेल येथे राहणाऱ्या रामोसचा कॅपिटल गॅझेट वृत्तपत्रावर राग होता. २०१२ मध्ये रामोसने कॅपिटल गॅझेट आणि त्यांच्या एका पत्रकाराविरोधात न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. पण या खटल्यात रामोसचा पराभव झाला. न्यायालयाने त्याच्या विरोधात निकाल दिला.

द कॅपिटलचे माजी स्तंभलेखक थॉमस हार्टले यांनी रामोसविरोधात एक बातमी लिहिली होती. रामोसने फेसबुकवरुन एक महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने त्या महिलेला पाठवलेल्या वेगवेगळया ई-मेल्समध्ये महिलेला अश्लील नावे दिली तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे त्या वृत्तात म्हटले होते.

त्यानंतर रामोसने हार्टले, तत्कालिन प्रकाशक थॉमस आणि कॅपिटल गॅझेट कम्युनिकेशनविरोधात खटला दाखल केला. हार्टले यांनी त्यांची बातमी प्रसिद्ध करण्याच्या पाचदिवस आधी रामोस छळ केल्या प्रकरणी दोषी ठरला होता. कॅपिटल गॅझेटने आपली बाजू योग्यप्रकारे मांडली नाही असे रामोसने त्याच्या याचिकेमध्ये म्हटले होते. २०१३ साली अमेरिकन न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर २०१५ साली वरच्या कोर्टानेही तोच निकाल कायम ठेवला. त्यामुळे रामोसचा कॅपिटल गॅझेटवर राग होता.

रामोसने गुरुवारी अमेरिकेतील अनापोलिस येथील कॅपिटल गॅझेटच्या कार्यालयात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५ जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाले. कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. एक बंदुकधारी व्यक्तीने दरवाज्यातून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक ठार झाले असे त्यांनी सांगितले.