अमेरिकेत वॉशिंग्ट डीसी येथे राहत असलेल्या एका २९ वर्षीय रशियन महिलेला रशियन सरकारसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. मारिया बुटीना असे या महिलेचे नाव असून ती अमेरिकन नागरिकांबरोबर संबंध विकसित करण्याबरोबरच राजकीय गटांमध्ये घुसखोरी करत होती असे अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने म्हटले आहे.

नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे बैठक झाली होती. दोन तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संबंध सुधारणेवर भर देणार असल्याचे म्हटले होते. अमेरिकेत रशियन महिलेवर हेरगिरीचा आरोप करुन तिला अटक होणे म्हणजे या भेटीचे एक प्रकारे खच्चीकरणे आहे असे मॉस्कोने म्हटले आहे.

वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मारिया बुटीनाला रविवारी अटक करण्यात आली. तिच्यावर रशियन सेंट्रल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरुन काम करत असल्याचा आरोप करण्यात आला. अमेरिकेच्या कोषागार कार्यालयाने या रशियन बँकेवर निर्बंध आणले आहेत. बुटीनाच्या फेसबुक पेजवर तिचे अॅलेक्सझांडर टॉर्शिन बरोबर अनेक फोटो आहेत. तो रशियन सेंट्रल बँकेचा उपप्रमुख आहे. बुटीन त्याची सहाय्यक म्हणून काम करत होती.