भारतामध्ये दिवसागणिक करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज २० हजारांच्या पुढे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सरकारने लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केला असला, तरीही प्रसार रोखण्यासाठी काही नियमांची सक्ती केलेली आहे. अशात आसाममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आमदाराच्या वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल दहा हजार लोक उपस्थित राहिले. या घटनेनंतर प्रशासनानं तीन गावे सील केली आहे.

आसाममधील नागाव जिल्ह्यातील आमदाराचे वडील खैरुल इस्लाम यांचं ८७ व्या वर्षी निधन झालं. दोन जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक उपस्थित होतं. ही माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ जवळील तीन गाव सील केली आहेत. खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक हजर असल्याचं दिसतेय. नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती.

नागावचे पोलीस उपायुक्त जादव सैकिया म्हणाले की, या प्रकरणी दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजूबाजूची तीन गावं पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. लोकांनी करोना महामारीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. लोकांनी सोशल डिस्टसिंग आणि मास्कसारख्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. आमदार इस्लाम यांनी द संडे एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं, “माझे वडील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांना मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्या अंत्यसंस्कराबाबत आम्ही पोलिसांना कल्पना दिली होती. अंत्यविधीला लोकांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांनी अनेक वाहनानां माघारी पाठवले. तरीही इतकी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले.