एका खऱ्या प्रियकरामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची खुर्ची जाणार का?, अशी चर्चा सध्या सोशल मिडीयात सुरू आहे. तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री होता येणार नाही, असं देखील एका प्रियकराने ठणकावून सांगितलं आहे. ज्या प्रियकराने थेट मुख्यमंत्र्यांना शाप दिला आहे. त्या प्रियकराच्या गर्लफ्रेंडचं बिहारमध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न झालं. हे लग्न थांबवण्यासाठी तरूणाने मुख्यमंत्री नितीशकुमारांना लॉकडाउनमध्ये लग्नांवर बंदी घालण्यास सांगितले होते, जे पूर्ण झाले नाही. त्यामुळे निराश झालेला प्रियकर पंकज कुमार गुप्ता मुख्यमंत्र्याना म्हणाला…तुम्हाला माझा शाप लागेल.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. नितीशकुमार यांनी ट्वीट केले, “५ मे २०२१ रोजी तीन आठवड्यांसाठी लॉकडाउन  वाढवण्यात आला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीचा पुन्हा पुन्हा आढावा घेण्यात आला. लॉकडाउनचा चांगला परिणाम झाला आणि करोना संक्रमणात घट झाली. त्यामुळे बिहारमध्ये लॉकडाऊन २५ मे नंतर म्हणजेच १ जून २०२१  पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ”

फक्त बेरोजगारीमुळे ती माझी होऊ शकली नाही

संतापलेला प्रियकर म्हणाला, “सर, तुम्ही एक नकारात्मक मुख्यमंत्री आहात. तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. गेल्या १९ मे रोजी मी तुम्हाला किती अपील केले होते, माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न थांबवा. पण तुम्ही प्रतिक्रिया दिली नाही आणि फक्त बेरोजगारीमुळे ती माझी होऊ शकली नाही. तुम्हाला माझा शाप लागेल”

काय आहे हे प्रेम प्रकरण

बिहारमधला लॉकडाउनही आता वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. त्यांच्या या ट्विटवर एका तरुणाने केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  नितीश कुमार यांच्या या ट्विटवर पंकज कुमार गुप्ता नावाच्या तरुणाने कमेंट करत चक्क लग्नांवरही बंदी घालण्याची मागणी केली होती. आपल्या या ट्विटमध्ये तो म्हणतो, “सर, जर तुम्ही लग्नांवर बंदी घातली तर माझ्या प्रेयसीचं १९ मेला होणारं लग्नही थांबेल. आम्ही जन्मभर तुमचे ऋणी राहू.”

या दोन्ही ट्विटवर सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. हे दोन्ही ट्विट्स वेगाने व्हायरल होत आहेत. तर बिहारमधली करोनाची स्थिती लक्षात घेता तिथला लॉकडाउन १६ मे पासून १ जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत.