लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना घरी परतण्याची परवानगी केंद्र सरकारने दिल्यानंतर, मजूर हळुहळु आपल्या गावी परतू लागले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान यासारख्या राज्यांमधून अनेक उत्तर प्रदेश, बिहारचे मजूर आपल्या घरी परतत आहेत. इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. १४ दिवसांच्या होम क्वारंटाइन काळात बिहार सरकार मजुरांना मोफत कंडोमचं वाटप करणार आहे.

“बिहारमध्ये आल्यानंतर प्रत्येक कामगार व मजुरांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) करण्यात आलं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे काही दिवसही त्यांना होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. या काळात अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता असते. यासाठी आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहोत. तसेच त्यांना आरोग्य विभागातर्फे मोफत कंडोमही वाटत आहोत.” आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली. बिहारमध्ये आतापर्यंत ८ लाखापेक्षा जास्त लोकांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करत आपल्या घरी जाणं पसंत केलं आहे. अजुन साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकं बिहारमध्ये क्वारंटाइन आहेत.

आणखी वाचा- अरेरे काय हे नशीब: दोन हजार कि.मी. चालत घरी पोचला, नी सर्पदंशानं दगावला

कुटुंब नियोजनासाठी कामगारांना मोफत कंडोमचं वाटप करण्यात येत असून त्याचा करोनाच्या प्रादुर्भावाशी कसलाही संबंध नसल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. यासाठी बिहार सरकार काही सामाजिक संस्थांचीही मदत घेत असल्याचं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. इतर राज्यांप्रमाणे बिहारलाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसला आहे. यामधून सावरण्यासाठी सर्व राज्य सरकार आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत.