क्षणाक्षणाला बदलणारे आकडे, उमेदवार, नेत्यांची घालमेल आणि ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे समर्थकांमध्ये आशा-निराशेचे चित्र, अशी उत्कंठावर्धक लढत मंगळवारी बिहारच्या राजकीय सारिपाटावर रंगली. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून किंचित आघाडी घेतलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ)शेवटपर्यंत पाठलाग करत राजदप्रणीत महाआघाडीने कडवी झुंज दिली. बिहारी मतदारांनी या दोन्ही आघाडय़ांना बहुमताच्या हिंदोळ्यावर झुलवले. अखेर मतदानोत्तर चाचण्यांचा कौल खोटा ठरवत ‘रालोआ’ सत्तेसमीप पोहोचली. मात्र, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद सर्वात मोठा पक्ष ठरला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजप-संयुक्त जनता दल यांची ‘एनडीए’ आणि राजद-काँग्रेससह डाव्या पक्षांच्या महाआघाडीत चुरस रंगली. सकाळी सर्व जागांचे कल हाती आले तेव्हा ‘एनडीए’ने किंचित आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मतमोजणीतील संथगतीमुळे ४ कोटी १६ लाख मतांपैकी दुपारी दीडपर्यंत फक्त एक कोटी मतांची मोजणी झाली होती.

दुपारनंतरही बहुमताचा कल ‘एनडीए’कडे कायम राहिला. मात्र, या दोन्ही आघाडय़ांमध्ये बहुमतासाठी अटीतटीचा सामना रंगल्याचे चित्र शेवटपर्यंत दिसले. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या आकडय़ांमुळे अनेकदा या आघाडय़ांमधील जागांचा फरक एकआकडी होता. आघाडीवर असलेल्या उमेदवाराला मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांनंतरही निर्णायक आघाडी नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.

सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आणि राजद यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेरचे आकडे हाती आले तेव्हा राजदने ७६ जागांसह बाजी मारली तर ७३ जागांसह भाजप दुसऱ्या स्थानावर होता.

संयुक्त जनता दल तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही पक्षांना या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. एमआयएम चार जागा जिंकत अन्य एका जागेवर आघाडीवर होती. त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे मानले जाते.

लोकजनशक्ती पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे या पक्षाची धुरा सांभाळणारे चिराग पासवान यांची खेळी अपयशी ठरली. निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ‘रालोआ’तून बाहेर पडलेल्या या पक्षाला निवडणुकीत फक्त एक जागा जिंकता आली. गेल्या निवडणुकीत या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या.

राजदची निवडणूक आयोगाकडे तक्रार

महाआघाडीच्या कथित विजयी ११९ उमेदवारांची यादी राजदने ट्विटरवर जाहीर केली. मुख्यमंत्री निवासस्थानावरून फोन करून दोन डझन जागांवर फेरफार करण्याचे प्रयत्न करण्यात आले, असा आरोप करत राजद-कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आयोगाने तक्रारींचे निरसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आपण कोणाच्याही दबावाखाली नसून, आयोगाची सर्व यंत्रणा प्रामाणिकपणे काम करत असल्याचे आयोगाचे सरचिटणीस उमेश सिन्हा यांनी सांगितले.

नितीशकुमारांना संधी की भाजपचा दावा?

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप सर्वाधिक जागा मिळवून मोठा भाऊ ठरल्याने नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला धक्का बसला आहे. नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल की त्यावर भाजप दावा करेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

भाजपला सर्वाधिक लाभ

बिहार विधानसभा निवडणुकीप्रमाणेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.  बिहारमध्ये २०१५ मध्ये भाजपला ५३ जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा जवळपास २० जागांची भर पडली.

– सत्ताबाजार

बिहारमधील ग्रामीण-गरीब, शेतकरी-कष्टकरी, व्यापारी, दुकानदार या प्रत्येक वर्गाने ‘रालोआ’च्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मूलमंत्रावर विश्वास दाखवला आहे. प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक प्रदेशाच्या संतुलित विकासासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहू, असे आश्वासन मी बिहारच्या नागरिकांना देतो.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

(मंगळवारी रात्री ११.४२ वाजता केलेले ट्वीट)

बिहार विधानसभा

एकूण जागा २४३

(रात्री १२ पर्यंतची आकडेवारी)

रालोआ : १२४ ’ महाआघाडी : १११