चांद्रयान-२ या महत्वकांक्षी मोहिमेसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची जोरदार तयारी सुरु असली तरी येत्या काही महिन्यात लष्करी दृष्टया अत्यंत महत्वाच्या उपग्रहांचे सुद्धा प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपित होणाऱ्या उपग्रहांपैकी काही उपग्रह रणनितीक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. या उपग्रहांमुळे कुरापतखोर चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आपल्या सुरक्षा यंत्रणांना मदत मिळणार आहे तसेच आपली जमीन आणि समुद्री सीमा अधिक सुरक्षित होईल.

सप्टेंबर महिन्यात इस्त्रो इंडियन एअर फोर्ससाठी GSAT-7A आणि टेहळणीसाठी RISAT-२A हा उपग्रह वर्षअखेरीस प्रक्षेपित करणार आहे. GSLV MK 2 या रॉकेटद्वारे GSAT-7A प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे एअर फोर्सची जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाईतळ आणि अवॉक्स विमानांमधील नेटवर्क जोडता येईल. यामुळे एअर फोर्सच्या युद्धक्षमतेमध्ये कैकपटीने वाढ होणार आहे.

GSAT-7A या उपग्रहाचे कार्य रुक्मिणी उपग्रहासारखेच असेल. खास भारतीय नौदलासाठी इस्त्रोने निर्मिती केलेल्या रुक्मिणी उपग्रहाचे २९ सप्टेंबर २०१३ मध्ये प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे नौदलाला भारतीय महासागर क्षेत्रातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवता येते. भारतीय युद्धनौका, पाणबुडया आणि विमाने कुठे आहेत याची माहिती ठेवता येते.रुक्मिणीला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. चिनी युद्धनौकांच्या हालचालीही रुक्मिणीच्या नजरेतून सुटत नाही.

रिसॅट-२ A उपग्रह वर्षअखेरीस PSLV रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात येणार असून यामुळे देशाची टेहळणी क्षमता कैकपटीने वाढणार आहे. दरम्यान सध्या सर्वांचे लक्ष भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेकडे लागले आहे. ८०० कोटी रुपये खर्च असलेल्या या मोहिमेची सुरुवात ऑक्टोंबर महिन्यात होणार आहे.