तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील लष्कराच्या हवाई तळावर शुक्रवारी हल्ला चढविला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १७ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे. या पैकी १६ जण एका मशिदीत नमाज पठण करीत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना एका कॅप्टनचा मृत्यू झाला. हल्लेखारांपैकी १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलांना यश आले आहे.
दोन ठिकाणांहून दहशतवाद्यांनी घटनास्थळी शिरकाव केला. त्यांनी अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्यामुळे काही जणांनी थेट मशिदीत प्रवेश केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथे जाऊन गोळीबार केला. या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती सामान्य नागरिक आहेत की लष्कराचे जवान हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल असीम बाजवा यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांकडून ताबडतोब प्रत्युत्तर देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हवाई तळावर कार्यरत असलेल्या लष्कराच्या जवानांनी शुक्रवारी सकाळी सहा दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादी हवाई तळावर घुसण्याच्या प्रयत्नात होते. स्फोटके लावलेले जॅकेट्स त्यांनी घातले होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे हातबॉम्ब, एके-४७ रायफल आणि मोठा शस्त्रसाठा होता, असे एका अधिका-याने सांगितले.