दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारमधील संघर्ष आता विकोपाला गेला असून दोन्ही बाजूंकडून हा तिढा सोडविण्याच्या हालचाली थंडावल्या असल्याने प्रशासन हादरले आहे.
दिल्लीच्या प्रभारी सचिवपदी शकुंतला गामलिन यांची नियुक्ती करण्याचा आदेश जारी करणारे प्रधान सचिव (सेवा) आनिंदो मुझुमदार यांच्या कार्यालयाला सोमवारी केजरीवाल सरकारच्या आदेशावरून टाळे ठोकण्यात आले. तर केजरीवाल यांनी मुझुमदार यांच्याऐवजी प्रधान सचिव (सेवा) पदावर राजेंद्रकुमार यांची केलेली नियुक्ती नजीब जंग यांनी रद्द ठरविली आहे.
प्रधान सचिव (सेवा) आनिंदो मुझुमदार सकाळी आपल्या कार्यालयात पोहोचले असता त्यांना आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आल्याचे निदर्शनास आले. अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार टाळे ठोकण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नायब राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार गामलिन यांच्या नियुक्तीचा आदेश काढणाऱ्या मुझुमदार यांची केजरीवाल यांनी शनिवारी पदावरून उचलबांगडी केली.  मात्र त्याच दिवशी सायंकाळी जंग यांनी मुझुमदार यांची बदली रद्द ठरविली. याबाबत आपली मान्यता घेण्यात आली नसल्याचे जंग यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या करण्याचे अंतिम अधिकार आपले असल्याचे जंग यांनी म्हटले आहे.
कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रश्न प्रभारी मुख्य सचिव गामलिन यांच्याकडे उपस्थित करण्याचे मुझुमदार यांनी ठरविले आहे.
 रिलायन्सच्या दोन कंपन्यांवर मेहेरनजर केल्याचा आरोप केजरीवाल यांनी गामलिन यांच्यावर केला. सरकारची कोंडी करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
राजेंद्रकुमार यांची नियुक्ती करताच जंग यांनी केजरीवाल यांना एक पत्र पाठविले. राजेंद्रकुमार यांची नियुक्ती करताना आपली परवानगी घेण्यात आली नसल्याचे, कारण देऊन जंग यांनी ही नियुक्ती रद्द ठरविली. उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र त्यांच्याकडे पोहोचण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांकडे पोहोचल्याबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आश्चर्य व्यक्त केले.

केंद्रीय गृहसचिवांशी चर्चा
दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिव शकुंतला गामलिन यांनी सोमवारी केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांची भेट घेतली. या वेळी दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी आणि गृहमंत्रालयातील सहसचिव (केंद्रशासित प्रदेश) राकेश सिंह उपस्थित होते. प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गामलिन यांनी गोयल यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गामलिन यांनी चर्चेचा तपशील सांगण्यास नकार दिला.