आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध सुब्रमण्य स्वामी मंदिराला देणगीमध्ये एक अजब वस्तू मिळाली आहे. या वस्तूचे नेमके करायचे काय ? असा प्रश्न तेथील मंदिर प्रशासनाला पडला आहे. तीन महिन्यानंतर मागच्याच आठवडयात जेव्हा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी दानपेटी उघडली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना  दानपेटीत रोख रक्कमेबरोबर अॅपलचा आयफोन ६ एस सापडला. तो आयफोन कोणी आणि कधी हुंडीमध्ये टाकला त्याची कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन महिन्यानंतर शुक्रवारी आम्ही नेहमीप्रमाणे हुंडी उघडली. हुंडीमध्ये जमा झालेली रोख रक्कम मोजत असताना बंद पाकिटात आम्हाला आयफोन सापडला. या आयफोन ६ एसचे कव्हरपासून ते वॉरंटी कार्डपर्यंत सर्व काही सोबत होते असे मंदिराच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. हुंडीमध्ये फोन सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. पण मुद्दामून हुंडीमध्ये फोन टाकण्याची ही पहिली वेळ आहे असे पदाधिकाऱ्याने सांगितले.
मोबाइल दुकानाच्या मालकाने तो फोन टाकला असावा असे पदाधिकाऱ्यांना वाटते. त्या आयफोनचे काय करायचे त्यावर मंदिर प्रशासन विचार करत आहे.

आयफोन संदर्भात प्रत्येकाने वेगवेगळी कल्पना मांडली आहे. या फोनचा लिलाव करुन पैसा उभा करावा असे काही जणांचे मत आहे तर हा फोन रिसेप्शन काऊंटरवर भक्तांचे शंकानिरसन करण्यासाठी वापरावा असे काहींचे मत आहे. यासंबंधी काय कराये त्यावर आम्ही सरकारच्या विभागाशी चर्चा करु असे मंदिर व्यवस्थापनाचे अधिकारी एम. शारदा कुमार यांनी सांगितले. आंध्रप्रदेशात विजयवाडा जवळ मोपीदेवी येथे भगवान सुब्रमण्य स्वामींचे मंदिर आहे. दर महिन्यात हजारो भक्त इथे दर्शनासाठी येत असतात.