डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सेक्युलरिझमची प्रेरणा माणसाला अधिक जबाबदार बनवणारी आहे. ही प्रेरणा आपल्याला कोणाचेही अहित वा द्वेष करायला शिकवत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि इतर सर्व साहित्याच्या माध्यमातून सर्वकल्याणकारी समाजरचनेचा , आदर्श समाजरचनेचा सुंदर प्रस्ताव मांडलेला आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची हमी यात आहे. शांततामय सहजीवनाचे ते हमीपत्र आहे. डॉ. बाबासाहेबांचा सेक्युलरिझम म्हणजे सौहार्दमय जीवन जगण्याचा वचननामा आहे.
समाजवाद , सेक्युलरिझम आणि आंबेडकरवाद यांचे फ्युजन म्हणजेच भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानातील प्रत्येक कलमांमध्ये या फ्युजनचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. भारतीय संविधानाची उद्देशिकेची सुरूवातच, ‘आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही’ या शब्दांपासून होते. समाजवाद आणि सेक्युलरिझम आणि आंबेडकरवाद या तिन्ही संकल्पना एकसंध स्वरुपाच्या आहे. समाजवाद आणि सेक्युलरिझम या संकल्पना पाश्चिमात्य आहेत. युरोपियन देशात १४ व्या शतकाच्या पूर्वी पोपशाहीची अनिर्बंध सत्ता होती. सामान्य माणसांची जीवन जगण्याची शैली ही पोपशाही ठरवीत होती. या पोपशाहीच्या धर्मांध, दैववादी प्रवृत्तीला नाकारुन समाजवाद आणि सेक्युलरिझम स्वीकारले. पण या संकल्पनेचे मूळ आपणास चार्वाक, बुद्धाच्या तत्वज्ञानात पाहावयास मिळते. यानंतर इस्लामाचे तत्वज्ञान समाजवाद आणि सेक्युलऱिझमवर आधारित आहे.
मूळ संकल्पनाची पुनर्रचना –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या पाश्चिमात्य संकल्पना आणि चार्वाक, बुद्धाच्या, इस्लामच्या तत्त्वज्ञानातील मूळ संकल्पनाची पुनर्रचना करुन, नव्याने फेरमांडणी भारतीय संविधानाच्या निमित्ताने केलेली आहे. ही फेरमांडणी म्हणजे मानवमुक्तीची फेरमांडणी आहे. या फेरमांडणीत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या घटकांना विशेष महत्व देण्यात आले आहे. माणूस हा कोणाचा गुलाम अथवा मालक राहणार नाही. कोणत्याही प्रकारची हुकूमशाही समाजात असणार नाही. आदर्श समाजाचे प्रारुप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  वरील दोन्ही संकल्पनांमधून मांडलेले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साम्यवादामध्ये असलेली समाजवादाची संकल्पना नाकारली आणि लोकशाही व्यवस्थेवर आधारित समाजवादाचा सिद्धांत मांडला.
समाजवाद या संकल्पनेत देशातील उत्पादन आणि वितरण व्यवस्था ही सामूहिक मालकीची असावी आणि कोणीही कोणाचेही शोषण करणार नाही. समाजवादाच्या माध्यमातून , सामाजिक हितातून व्यक्तीचे हित साधता येते. समाजवादातून व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि आर्थिक समानता साधता येते. समाजावादतून सामूहिक मालकी आणि नियंत्रण ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. राष्ट्रीय उत्पादनावर सामूहिक मालकी आणि त्याचे नियंत्रणही सामूहिकरीत्या व्यायला हवे. त्याप्रमाणे वर्गविहिन समाज निर्माण व्हावा, समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे वर्ग नसावेत, गरीब-श्रीमंत हा भेद नष्ट व्हावा, समाजात एकमेकांना सहकार्य करण्याची भावना वृद्धिंगत व्हावी, समाजात कोणत्याही प्रकारची सामाजिक विषमता असता कामा नये, हे सर्व सामाजिक लोकशाहीनेच साध्य होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाची फेरमांडणी करताना, सर्वसामान्य ‘माणूस’ हाच केंद्रस्थानी गृहीत धरला आहे. त्यांनी केलेली समाजवादाची मांडणी, सर्वसामान्य माणसाचा गौरव करणारी आहे. सर्वसामान्य माणसाला नायक करणारी ती प्रक्रिया आहे. माणसाला माणूसपणाचा गौरव वाटावा अशी ही प्रक्रिया आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन हे सन्मानाने मोहरुन यावे. माणूसपणाचे स्वप्न सतत त्याच्या डोळ्यात फुलत राहावे अशी समाजवादाची मांडणी डॉ. बाबासहेब आंबेडकरांनी केलेली आहे. प्रत्येक माणसाने आपले काम जीव ओतून करावे. प्रत्येक काम एकाग्रतेने करावे. आपल्या कामामुळे आपण दुस-यांना ओरबाडणार नाही याची दक्षता घ्यावी. समाजात वावरताना आपण दुस-याची फसवणूक कऱणार नाही, दुस-याशी लबाडी करणार नाही, दुस-याचे शोषण करणार नाही या गोष्टींचा स्पर्शही माणसाच्या मनाला होणार नाही याची काळजी समाजमनाने घ्यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजवाद  या सिद्धांतामधून आदर्श माणूस, इहवादी माणूस कसा निर्माण करता येईल यावर कटाक्ष दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजवादाचे ध्येय हे शांततामय सहजीवन हेच आहे. येथील माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक न्याय यांना आपली जीवनशैली मानावी तेव्हाच जात , वर्ग , धर्म, आणि लिंगविरहित मनाची निर्मिती होईल. त्याचप्रमाणे समाजामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक आणि सामाजिक विषमता असू नये. प्रत्येक माणसाला भयमुक्त जीवन जगण्याची मुभा असावी हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादाचा, समाजवादाचा जाहीरनामा आहे.
सेक्युलरिझम म्हणजेच इहवाद –
सेक्युलरिझम हे मानवी जीवनाला उपकारक आहे. सेक्युलरिझम या संकल्पनेचा अर्थच ‘निधर्मी’ असा आहे. सेक्युलरिझम म्हणजेच इहवाद होय. या संकल्पनेत स्वर्ग, नरक, परलोक, पुनर्जन्म या गोष्टींना थारा नाही. समाजाचा शेवटचा घटक हा व्यक्तीचाच असावा तो कोणत्याही धर्माचा , जातीचा, पोटजातीचा, असू नये. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र असे अस्तित्व असते. सेक्युलरिझममध्ये हे अस्तित्व अबाधित राहते. प्रत्येक माणसांमाणसात स्नेहाचे संबंध हे परस्परांमधील सर्जनशील नात्याचे प्रतीक असते.
डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या सेक्युलरिझम संकल्पनेत धर्माला स्थान नाही. कारण धर्म ही संकल्पना विषमता, अन्याय, शोषण, पारतंत्र्य यालाच मूल्य मानते. विषमता , अन्याय, शोषण, पारतंत्र्य या गोष्टी मूल्य ठरु शकत नाही. सेक्युलरिझम या संकल्पनेला पुनर्जन्म कबूल नाही. समजाला विघातक असणा-या सर्वच गोष्टींपासून मुक्त असणारे मानवीपण त्यांना अपेक्षित होते. माणूस म्हणून जन्माला आलेल्या बाळाला कोणती जात, धर्म, पंथ यांचे डोस पाजू नये. त्याला विविध अंधश्रद्धांना बळी पडू देऊ नये. या सर्व गोष्टी माणसाला माणसापासून विलग करतात. म्हणून अशा संस्कांरापासून तो दूर राहील याची काळजी घेणे मह्त्त्वाचे आहे. हे जसे जन्म घेणा-या बाळासाठी आहे तसेच ते मोठ्या माणसांसाठीही आहे. येथील सर्व लोकांनी अमानुषतेच्या विषापासून दूर व्हावे. केवळ माणसात त्याच्या माणूसपणाची वाढ व्हावी. माणुसकीचे टॉनिक भारताबाहेर सॉक्रेटिक्स, मार्क्स, सात्र, लिंकन इत्यादींनी दिले आहे. भारतात चार्वाक, बुद्ध , फुले, आंबेडकर इत्यादींनी दिले आहे.
विज्ञाननिष्ठ आंबेडकरवाद –
आंबेडकरवाद म्हणजे नीती आणि नीती म्हणजेच आंबेडकरवाद होय. आंबेडकरवाद हा विज्ञाननिष्ठ आहे. जीवनाला सत्य मानणारी प्रणाली म्हणजेच आंबेडकरवाद आहे. आंबेडकरवादाचा मूळ गाभा हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आंबेडकरवादाने पाप-पुण्य, कर्मकांढ, अंधश्रद्धा, ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म या सर्व गोष्टींना नकार दिला आहे. या सर्व गोष्टी माणसाच्या मेंदूला बधिर करणा-या आहे. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मानवी देह हे आप , तेज , वायू आणि पृथ्वी या चार भौतिक तत्वांपासून तयार होतो. डॉ. बाबासाहेबांनी आकाश हे तत्व नाकारले आहे. त्यांनी पाचवा घटक विज्ञानाला मानले आहे. माणसाच्या मानसविश्वाला त्यांनी ‘नामस्कंध’ म्हटले आहे. हे नामस्कंध म्हणजे विज्ञान आहे.
आंबेडकरवाद हे विचारस्वातंत्र्याला मह्त्व देणारे तत्वज्ञान आहे. प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याची मुभा असावी. जर माणूस स्वतंत्रपणे विचार करणार नाही तर त्याचे जीवन हे गुलामीचे ठरेल. आंबेडकरवाद माणसाला नायकत्व देतो. आंबेडकरवादात समता , बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांचा उद्घोष केला आहे. मानवी जीवनाच्या भोवती जाती , धर्माची चौकट आंबेडकरवादाला मंजूर नाही. माणूस हा माणूसच आहे. या माणसाने इतरांचे माणूसपण अबाधित ठेवावे. माणसाने आपल्या कर्तृत्वाने आपले माणूसपण सतत फुलवीत ठेवावे. स्वतःचे माणूसपण फुलविताना इतरांच्या माणूसपणाला इजा पोहोचणार नाही याचीही दक्षता घ्यावी, हेच आंबेडकरवादाचे सांगणे आहे.
आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला समाजवाद आणि सेक्युलरिझमचे सदस्य होणे गरजेचे आहे. या दोन बाबीच आपल्याला सर्वकल्याणकारी ठरणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद आणि सेक्युलरिझम हाच येथील समाजाला राजकीय आणि समाजिक पडझडीतून बाहेर काढू शकतो.
(लोकराज्यच्या एप्रिलच्या अंकातून साभार, लेखक – डॉ. अक्रम ह. पठाण, अंजूमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सदर नागपूर)