हरियाणामध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपकडून निवडणुकीपूर्वी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या पहिल्याच बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही माहिती दिली. स्थगिती आणण्यात आलेल्या निर्णयांपैकी जे निर्णय जनतेच्या हिताचे असतील ते यापुढेही अंमलात आणले जातील. मात्र, ज्या निर्णयांचा जनतेच्या हिताशी संबंध नसेल ते रद्द केले जाणार असल्याचे खट्टर यांनी जाहीर केले.
माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्या काळात करण्यात आलेली नोकरदारांची भरती आणि नियुक्तीच्या निर्णयावरही भाजपने तात्पुरती स्थगिती आणली आहे. ही संपूर्ण प्रक्रियाच नव्याने घेणार असल्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत. याशिवाय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात काँग्रेसने शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयालाही स्थगिती देण्यात आली आहे. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार असल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली होती.