नुकत्याच अस्तित्त्वात आलेल्या बलात्कारविरोधी कायद्यातील कलमाच्या आधारे व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची देशातील पहिली घटना दिल्लीमध्ये घडली. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमाततळाबाहेरील एका कॅब कंपनीच्या व्यवस्थापकाला महिलेची छेड काढल्याबद्दल आणि तिला त्रास दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केली.
भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५४ डी नुसार २५ वर्षीय व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उस्मान असे या व्यक्तीचे नाव आहे. राष्ट्रपतींनी नुकतीच स्वाक्षरी केलेल्या बलात्कारविरोधी कायद्यामध्ये या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. या कलमांतर्गत एखाद्या व्यक्तीला अटक झाल्याची देशातील ही पहिलीच घटना आहे, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची हकीकत अशी, मुंबईतील एका आयटी कंपनीत काम करणाऱया एका महिलेने कॅबसाठी आपला मोबाईल क्रमांक आणि नाव दिल्लीतील विमानतळाबाहेरील एका कॅब कंपनीच्या व्यवस्थापक असलेल्या उस्मानला दिला. त्यानंतर उस्मानने तिला सातत्याने फोन करण्यास सुरुवात केली. ‘मला माहिती आहे की तुम्ही अडचणीत आहात. मी तुमच्या सर्व समस्या सोडवू शकतो.’, या स्वरुपाचे वक्तव्य उस्मान संबंधित महिलेशी सातत्याने करीत होता. दिवसातून तब्बल ६५ वेळा फोन करून उस्मान या महिलेला सारखा त्रास देत होता. ही माहिती तिने पोलिसांना दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली.
संबंधित महिला भंटिडाजवळ असलेल्या मुश्कतारमधील रहिवासी आहे. ती कंपनीच्या कामासाठी मुंबईहून दिल्लीमार्गे लुधियानाला जात असताना हा सर्व प्रकार घडला.