केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या मुलूखमैदानी तोफ समजल्या जाणाऱ्या उमा भारती यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांशी बोलताना याची घोषणा केली. वय आणि आरोग्याचा हवाला देत, आता मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पण पक्षासाठी मी काम करतच राहील, अशी ग्वाही दिली.

त्या म्हणाल्या, मी दोन वेळा खासदार राहिले आहे आणि पक्षासाठी खूप काम केले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वयात मला शारीरिक त्रास सुरू झाला आहे. कंबर आणि गुडघ्यांच्या दुखण्यामुळे चालताना त्रास होतो. पण यापुढे पक्षाच्या प्रचाराचे काम करत राहीन.

राम मंदिरबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे. त्यामुळे परस्पर सहमतीनेच राम मंदिराची निर्मिती झाली पाहिजे. उमा भारती या खजुराहो, भोपाळ आणि झांसी मतदारसंघातून लोकसभेवर आल्या आहेत. त्याचबरोबर मलेहरा आणि चरखारी येथून राज्य विधानसभेवर निवडूनही त्या गेल्या होत्या. बुंदेलखंडमधील प्रभावशाली नेत्या आणि हिंदूवादी नेत्या म्हणून त्यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीसाठीही त्या प्रसिद्ध आहेत.

मी तर राजकारणातील ‘मोगली’- उमा भारती

काही दिवसांपूर्वीच उमा भारतींनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी भाष्य करताना मी राजकारणातील मोगली असल्याचे म्हटले. राजकारण हा माझा पिंड नसतानाही मी या क्षेत्रात कशी आले, याचे मला आश्चर्य वाटते. १९८९ पासून मी खासदार आहे, आता मी ५८ वर्षांची झाली आहे. तरीही राजकीयदृष्ट्या मी स्थिरावले आहे, असे मला वाटत नाही. राजकारण हा काही माझा पिंड नव्हता. मला एखादे काम दिले की, मी त्यामध्ये स्वत:ला संपूर्णपणे झोकून देते. हे फक्त राजकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही. यापूर्वी मी अयोध्येत आंदोलन केले किंवा कर्नाटकमध्ये तिरंगा आंदोलन केले. याशिवाय, ईशान्य भारतात होणाऱ्या घुसखोरीविरोधातही मोहीम छेडली होती. इतकेच काय मध्य प्रदेशातील परिस्थिती बिघडली असताना माझ्यावर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या प्रत्येकवेळी मी निष्ठेने काम केले. या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार करताना आपल्यात एवढी उर्जा, निरागसता आणि निष्ठा कुठून आली, असा प्रश्न मला पडतो. तेव्हा माझ्यात आणि मोगलीत मला साम्य आढळले, असे उमा भारती यांनी म्हटले होते.