पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर याला कर्नाटकातील कोर्टाने १५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. कर्नाटकातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) शुक्रवारी (दि.१०) त्याला अटक केली होती. मूळच्या औरंगाबादच्या असलेल्या देवडीकरला एसआयटीने झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. तीन हल्लेखोरांनी लंकेश यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता.

गौरी लंकेश एक पत्रकार होत्या, कन्नडमधील ‘लंकेश पत्रिके’च्या त्या संपादक. या वेगळ्या वृत्तपत्राची सुरुवात त्यांचे वडील पी. लंकेश यांनी १९८० मध्ये केली होती. ‘लंकेश पत्रिका’ हे व्यावसायिक वृत्तपत्र नव्हते. आंदोलनकारी विवेकवादी विचारसरणीच्याच बाण्याने त्यांची पत्रकारिता प्रेरित होती.