संपूर्ण देशभरामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गुजरातही याला अपवाद नाही. करोनाची लक्षणे आढळलेल्या अनेकांना होम क्वारंटाइन म्हणजे घरीच विलगीकरणामध्ये थांबण्याचे निर्देश आहेत. अशी अलिप्तता राखल्याने व विलगीकरण केल्याने या विषाणूचा संसर्ग इतर व्यक्तींनाही होण्याची शक्यता कमी होते. पण असे अनेक जण समाजात बिनधास्तपणे वावरत आहेत.

मागच्या दहा दिवसात गुजरातमध्ये तब्बल ९३ जणांनी होम क्वारंटाइनचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. होम क्वारंटाइनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुजरात पोलिसांनी आतापर्यंत १० एफआयआर नोंदवले आहेत. होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्यांना सक्तीने घरी थांबवले जात आहे.

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ४३३ जणांना सरकारी क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे तर, ६०९२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी होम क्वारंटाइनचे उल्लंघन करणाऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

अहमदाबादमध्ये होम क्वारंटाइनचे उल्लंघन करुन बर्थ डे पार्टीला गेलेल्या दोघांविरोधात अहमदाबाद पोलिसांनी एफआयआर नोंदवला. आरोग्य खात्याचे स्पष्ट निर्देश असतानाही अशा प्रकारे उल्लंघन सुरु आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्यावतीने मणिनगर पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

लॉकडाउनला गंभीरतेनं घ्या : पंतप्रधान
लॉकडाउन सध्या कोणीही गंभीरतेनं घेत नाहीयेत. कृपया यापासून स्वत:ला वाचवा. आपल्या कुटुंबीयांना, स्वत:ला वाचवा. नियमांचं पालन करा. तसंच राज्यसरकारांनीही नियम आणि कायद्यांचं पालन करून घ्यावं अशी सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन केल्या आहेत.