वर्षभराच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुजरातमध्ये परप्रांतीयांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा आणि अहमदाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये परप्रांतीयांविरोधात हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारामध्ये खासकरुन उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

नोकरी, रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये आलेल्या अनेक परप्रांतीयांनी मारहाणीच्या भितीपोटी राज्यातून पळ काढला आहे. गुजरातच्या पाच जिल्ह्यातील हिंसाचारा प्रकरणी गुजरात पोलिसांनी आतापर्यंत १८० जणांना अटक केली आहे. मागच्या आठवडयात गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका चौदा महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणी पोलिसांनी रविंद्र साहू या आरोपीला अटक केली आहे. रविंद्र साहू मूळचा बिहारचा आहे. त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये परप्रांतीयांविरोधात हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांना गुजरातमध्ये लक्ष्य केले जात आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. आतापर्यंत आम्ही १५० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे तसेच परप्रांतीय ज्या भागात जास्त संख्येने रहातात तिथे गस्त वाढवली आहे असे गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी सांगितले.

बलात्काराच्या घटनेनंतर विशिष्ट समाजाचे लोक परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत असे शिवानंद झा यांनी सांगितले. परप्रांतीयांवर झालेल्या हल्ल्यामागे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर असल्याचा आरोप करण्यात येत असून तो ठाकोर सेनेचा अध्यक्षही आहे. त्याने ७२ तासांच्या आत त्याच्या समाजाच्या सदस्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.

जे कोणी या घटनांमागे आहेत त्या सर्वांना मी शांतता राखण्याचे आवाहन करतो. आमच्या समाजाचे ठाकोर सेनेचे काही लोक असू शकतात. पण कोणावर हल्ला करण्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत.  आमची आणि ठाकोर सेनेची बदनामी करण्याचा हा कट आहे. आम्हाला राज्यात शांतता आणि रोजगार हवा आहे असे अल्पेश ठाकोरने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.