हिंदू महासभेने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे मंदिर तयार केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाची कोणताही परवानगी नसतानाही हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी ग्वाल्हेरमध्ये नथुराम गोडसेचे मंदिर उभारले आहे. कार्यकर्त्यांनी गोडसेची मूर्ती तयार केली असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

‘आम्ही ९ नोव्हेंबरला प्रशासनाकडे नथुराम गोडसे यांचे मंदिर उभारण्यासाठी जमीन मागितली होती. मात्र प्रशासनाने जमीन देण्यास नकार दिला. त्यामुळेच दौलतगंजमधील आमच्या कार्यालयातच गोडसे यांचे मंदिर तयार केले,’ असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितले. याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘या प्रकरणाची माहिती आम्हाला मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालत आहेत. कायदेशीर सल्ला घेऊन यातील दोषींवर कारवाई केली जाईल,’ असे पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊस्कर यांनी म्हटले.

या प्रकरणाचे पडसाद मध्य प्रदेशच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्यात आल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी म्हटले. ‘याआधी मुरैना येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आग लावण्यात आली होती. यानंतर आता हिंदू महासभेने महात्मा गांधीच्या मारेकऱ्याचे मंदिर उभारले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या लोकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी सिंह यांनी केली.