जमावाकडून मारहाणीच्या घटना देशात वारंवार घडताना दिसत आहेत. दरम्यान, आणखी एक नवी घटना समोर आली आहे. यामध्ये अंधश्रद्धेतून ४ जणांना जमावाकडून बेदम मारहाण करुन त्यांचा गळा चिरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यात शनिवारी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील सिसकारी गावातील ही घटना असून शनिवारी १० ते १२ लोकांनी चार पीडितांना त्यांच्या घरातून बाहेर काढले आणि त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर निर्घृणपणे त्यांचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. प्राथमिकदृष्ट्या मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची हत्या करण्यात आली आहे ते जादूटोणा करीत होते. त्यामुळे अंधश्रद्धेतून या चौघांची हत्या झाली आहे. या चौघांची हत्या करण्यापूर्वी ग्रामस्थांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांच्यावर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंजनीकुमार झा यांनी दिली.

दरम्यान, मारहाण आणि हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. ज्या लोकांची हत्या करण्यात आली आहे त्यामध्ये ६० वर्षीय चापा उरांव, त्यांची पत्नी पीरा उराईन यांच्यासह गावातील इतर दोन लोकांचा समावेश आहे. घटनेनंतर गावातील बहुतांश घरांना टाळे लावून ग्रामस्थ बाहेर निघून गेले आहेत. त्यामुळे पोलीस सरपंचाकडे चौकशी करीत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काठ्या, दांडकी तसेच धारदार हत्यारं घेऊन आलेल्या १० ते १२ लोकांनी ३ घरांचे दरवाजे जबरदस्तीने खोलायला लावून ४ लोकांना आपल्या ताब्यात घेतले आणि बाहेरून त्यांच्या घरांना टाळे लावले. त्यानंतर मारेकरी या चौघांना गावाच्या वेशीजवळ घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांना काठ्या आणि दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांचा गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली.