करोना व्हायरसच्या दहशतीचा सामना करणाऱ्या भारताने प्रथमच दोन इटालियन रुग्णांवर उपचार करताना लोपिनावीर/रिटोनावीर या औषधांचा वापर केला. लोपिनावीर/रिटोनावीर ही HIV प्रतिबंधक औषधे आहेत. भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका एका इटालियन जोडप्याला करोना व्हायरसची लागण झाली असून जयपूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी त्या रुग्णांची रीतसर परवानगी घेण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. “करोना व्हायरसच्या रुग्णांवर एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी आयसीएमआरने परवानगी घेतली आहे. इमर्जन्सीमध्ये लोपिनावीर/रिटोनावीर औषधांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.” अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.

“या औषधांचा रुग्णाच्या प्रकृतीवर चांगला परिणाम होतोय हे आत्ताच म्हणणे जरा घाईचे ठरेल. चीनमध्ये या औषधाचा वापर करण्यात आला आहे. हे नवीन औषध नाहीय. या औषधाचे काही साईड इफेक्टस आहेत” असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. करोना व्हायरसची चीनमधून निर्मिती झाली. या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जगभरामध्ये वेगाने वाढत आहे. भारतातही करोनाचे अनेक रुग्ण आढळले असून, ही संख्या कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.