पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत भारतामध्ये मुस्लिम विरोधी आणि पाकिस्तान विरोधी विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आहे असे त्यांनी सांगितले. तुमच्या मैत्रीच्या संकेतांना भारताकडून सकारात्मक प्रतिसाद का मिळत नाहीय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

भारतामध्ये पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यामुळे माझा प्रस्ताव धुडकावला जातोय. भारतात मुस्लिम विरोधी, पाकिस्तान विरोधी विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आहे असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपावर टीका करण्याची इम्रान खान यांची ही पहिली वेळ नाही. सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रातील सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबरची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा रद्द केल्यानंतर भारताच्या या निर्णयातून अहंकार दिसतो अशी टीका त्यांनी केली होती.

त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला होता. मुंबईमधील २६/११ ची घटना हा दहशतवादी हल्ला होता. त्याबद्दल काही तरी करण्याची इच्छा त्यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. शीख भाविकांसाठी कर्तारपूर मार्गिका खुली करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षासुद्धा त्यांनी व्यक्त केली.