देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतात गेल्या १२ तासांमध्ये ३०२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, गेल्या दहा तासांमध्ये राज्यात नवीन १४५ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३५ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मरकजमधील राज्यातील १२२५ पैकी १०३३ जणांशी संपर्क

तसेच दिल्लीतल्या निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांच्या राज्यातील १२२५ जणांच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला आहे. यांपैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलं आहे. यांपैकी ७ जण करोनाबाधित असून पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर येथील प्रत्येकी २, तर हिंगोलीतील एका रुग्णाचा यामध्ये समावेश असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांचे दिवे लावण्याचे आवाहन

करोनाच्या आजारामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना घरातून बाहेर पडता येत नाही तसेच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हे निराशेचं वातावरण झटकून टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट बंद करुन दिवा, मेणबत्ती, टॉर्च आणि मोबाईल फ्लॅश चालू करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.