जम्मू-काश्मीर विधानसभेत बुधवारी कृषिमंत्रालयाच्या अनुदानावरून चर्चा सुरू असताना गदारोळ माजला. तेव्हा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या विरोधी पक्षाच्या आमदाराने मार्शलच्याच श्रीमुखात भडकावण्याचा प्रकार घडला. या अभूतपूर्व प्रकारामुळे विधिमंमडळात एकच खळबळ उडाली.
स्थालांतरितांना शिधावाटपाचा तुटवडा जाणवत असल्याच्या प्रश्नावरून पीडीपीचे आमदार सय्यद बशीर संतप्त झाले आणि त्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेतली आणि घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष मुबारक गुल यांनी मार्शलना पाचारण करून बशीर यांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले.
बशीर यांना घेऊन मार्शल सभागृहाबाहेर जात असताना पक्षाचे अन्य आमदार मोकळ्या जागेत धावले. त्यामुळे सभागृहातील गदारोळ अधिकच वाढला. त्यामुळे त्यांनाही बाहेर काढण्याचे आदेश गुल यांनी मार्शलना दिले. आमदारांना सभागृहाबाहेर घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू असताना बशीर यांनी अचानक एका मार्शलच्या शर्टाची कॉलर पकडली आणि तीन वेळा त्याच्या श्रीमुखात भडकावली.