कर्नाटकातील चामराजनगरमधील सुलवाडी गावातील एका मंदिरात प्रसाद खाल्ल्यानंतर ११ जणांचा मृत्यू झाला असून ८० जण आजारी पडले आहेत. मृतांमध्ये एका १५ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. आजारी पडलेल्या भाविकांना वेगवेगळया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रसादातून विषबाधा झाल्यामुळे ही घटना घडली असावी असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही प्रसादाचे नमुने घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना म्हैसूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमानंतर प्रसादवाटप झाले. प्रसाद खाल्ल्यानंतर अनेकांना उलटया, मळमळणे आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्रास सुरु झाल्यानंतर नागरिकांनी लगेच जवळच्या रुग्णालयात धाव घेतली.कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी या घटनेने आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले.

प्रसाद खाऊन आजारी पडलेल्या भाविकांच्या उपचाराची व्यवस्था करण्याचे मी आदेश दिले आहेत असे ते म्हणाले. प्रसाद खातान रॉकेलचा वास आला पण त्याकडे दुर्लक्ष केले असे नागरिकांनी सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांची भेट घेऊ शकतात.