उत्तर प्रदेशात प्रजासत्ताक दिनानिमित्त एका समाजाकडून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान शुक्रवारी कासगंज जिल्ह्यात झालेल्या जातीय दंगलीनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारीही समाजकंटकांनी मोठा हिसाचार घडवून आणला. यावेळी जमावाकडून दोन बस पेटवून देण्यात आल्या. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. तणावाची परिस्थिती वाढत असताना कासगंजकडे निघालेल्या साध्वी प्राचीला पोलिसांनी सिकंदराराऊ येथे रोखले. यामुळे साध्वीने आपल्या समर्थकांसह धरणे आंदोलन सुरु केले आहे.


शुक्रवारी अभिषेक ऊर्फ चंदन गुप्ता (वय २२) नामक तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारादरम्यान वाद निर्माण झाला होता. चितेला अग्नी दिल्यानंतरही लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता. दरम्यान, खासदार राजवीर सिंह यांनी संबंधीत समाजाच्या नेत्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणे करुन दिल्यानंतर या तरुणावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

मात्र, अंत्यसंस्कारानंतर परतताना जमावाने उग्र रुप धारण करीत परिसरातील दुकाने पेटवायला सुरुवात केली. रस्त्यातील भाज्यांच्या गाड्याही त्यांनी पलटी केल्या. दुकानांची तोडफोड करीत दोन बसही पेटवून देण्यात आल्या. दरम्यान, लवकुशनगर भागात जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली होती.

प्रजासत्ताकदिनी शुक्रवारी कासगंज शहरात एका समाजाने तिरंगा यात्रा काढली होती. ही यात्रा बड्डूनगर येथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या समाजाच्या एका गटासोबत त्यांचा वाद झाला. दरम्यान, बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. यामध्ये यात्रा काढलेल्या समाजाचा तरुण चंदन गुप्ता याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले. या घटनेनंतर हिंदूत्ववादी संघटनांनी शहरातील बाजारपेठा बंद पाडल्या. लोक रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध करायला लागले. दरम्यान, अनेक ठिकाणी दगडफेक आणि हिंसाचार करण्यात आला.