दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला आहे. जावेद अहमद दार असे या कॉन्स्टेबलचे नाव असून तो केमिस्टकडे जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. दहशतवाद्यांनी काचदोरा गावातून या कॉन्स्टेबलचे अपहरण केले होते.
यावर्षी एप्रिल महिन्यात याच गावात सुरक्षा पथकांनी पाच दहशतवाद्यांचा चकमकीमध्ये खात्मा केला होता. हिजबुल या दहशतवादी संघटनेचा या अपहरणामागे हात आहे असे वृत्त आजतकने दिले आहे. मागच्या महिन्यात भारतीय लष्करातील राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केली होती.
ईदच्या सुट्टीसाठी तो घरी जात असताना औरंगजेबचे अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. जम्मू- काश्मीरमध्ये तैनात असलेल्या औरंगजेबचे १४ जून रोजी अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली. औरंगजेबच्या हत्येनंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली होती. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथून औरंगजेबचे अपहरण करण्यात आले होते.
हिज्बुल कमांडर समीर टायगरला मारण्यात आलेल्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होता. तो ४४ राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये रायफलमॅन म्हणून शोपियां जिल्ह्यात तैनात होता. यापूर्वी सुद्धा काश्मीरमध्ये लष्करीसेवेत असणाऱ्या जवानांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 5, 2018 11:16 pm