जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या करोना व्हायरसचा भारतातही फैलाव होत असून दररोज अनेक करोना पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत अशा रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये लक्ष ठेवण्यात येत आहे.

Covid-19 च्या रुग्णांसाठी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरु करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. केरळ सरकारने आयसोलेशन वॉर्डमधल्या रुग्णांसाठीच्या खाद्यपदार्थांचा मेन्यू जाहीर केला आहे. कलामसेरी सरकारी वैद्यकीय रुग्णालयाने भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी दोन खास वेगवेगळे मेन्यू ठेवले आहेत अशी माहिती एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एस. सुहास यांनी दिली.

भारतीयांसाठी हा मेन्यू
ब्रेकफास्टमध्ये भारतीयांना डोसा, सांबार, दोन उकडलेली अंडी, संत्री, चहा आणि पाण्याची बाटली दिली जात आहे. सकाळी १०.३० वाजता ज्यूस दिला जातो. दुपारच्या भोजनामध्ये चपातीसह तळलेले मासे, मिनरल वॉटर दिले जाते. दुपारी चहासोबत बिस्कीटे दिली जातात. रात्रीच्या जेवणात अप्पम, खिचडी आणि दोन केळी दिली जातात.

आणखी वाचा- Coronavirus: लष्कराच्या एका जवानालाही करोनाची लागण; सैन्यातील पहिलीच घटना

परदेशी नागरिकांसाठी हा मेन्यू
आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या परदेशी नागरिकांसाठी दुसरा मेन्यू आहे. ब्रेकफास्टमध्ये सूप, फळे आणि दोन उकडलेली अंडी दिली जातात. लंचमध्ये टोस्ट ब्रेड, चीज आणि काही फळांचा समावेश आहे. दुपारी चहाऐवजी फळांचा रस दिला जातो. रात्रीच्या जेवणात टोस्ट ब्रेड, अंडी आणि फळांचा समावेश आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये असलेल्या रुग्णांना दररोज वर्तमानपत्र वाचायला मिळते. अन्य वॉर्डप्रमाणेच आयसोलेशन वॉर्डमध्ये सर्व सुविधा आहेत अशी माहिती सुहास यांनी दिली. केरळच्या वेगवेगळया रुग्णालयात सध्या २६८ जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.