महेंद्रसिंह धोनी त्याचा आदर्श होता. भारतीय संघाची निळी जर्सी परिधान करण्याचे त्याने स्वप्न पाहिले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मैदानावर ट्वेंटी-ट्वेंटीचा मैत्रीपूर्ण सामना सुरु असताना काळाने त्याला गाठले. सोनू यादव या युवा क्रिकेटपटूचा  सामना सुरु असताना दुर्देवी मृत्यू झाला. कोलकात्ताच्या बाटा मैदानावर बुधवारी ही दुर्देवी घटना घडली.

सोनू यादव अवघ्या २२ वर्षांचा होता. तो बॅलीगंज स्पोर्टिंग असोशिएशनकडून खेळायचा. अखेरच्या सामन्यात सोनूने पाच चेंडूत १२ धावा केल्या. सोनू बाद होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना अचानक मैदानावर कोसळला. ह्दयविकाराच्या झटक्याने सोनूचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मधल्या फळीत फलंदाजी करणारा सोनू यष्टीरक्षणही करायचा. सोनूच्या अकाली निधनाबद्दल क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगालनेही दु:ख व्यक्त केले आहे.

झेलबाद होण्याआधी सोनू काही चांगले फटके खेळला. सोनू पॅव्हेलियनच्या दिशेने परतत असताना अचानक मैदानावर कोसळला. मैदानावरील खेळाडूंनी लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली. सोनू कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने त्याला बाईकवरुन ईडन गार्डन्सवरील कॅबच्या मेडिकल युनिटमध्ये नेण्यात आले. जे बाटा मैदानापासून दीड किलोमीटर अंतरावर होते. ईडन गार्डन्सवरील डॉक्टरने त्याला एसएसकेएम रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेतून सोनूला तात्काळ रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर सोनूला मृत घोषित केले.