वेगवेगळया महिलांसोबत प्रणयाचे व्हिडीओ बनवून, ते सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या दोघा गर्भश्रीमंतांना कोलकात्ता पोलिसांनी बुधवारी अटक केली. महिलांकडून पैसे उकळण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटकेत असलेले दोन्ही आरोपी कोलकात्यातील नावाजलेल्या औद्योगिक घराण्याचे सदस्य आहेत. या प्रकरणात एका आचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. तो एका औद्योगिक कुटुंबात स्वंयपाकी आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तीन महिन्यांच्या तपासामध्ये त्यांच्याकडे १८२ महिलांचे व्हिडीओ सापडले आहेत. तिन्ही आरोपींना काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. एका महिलेकडे १० लाख रुपये खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात पुढच्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिलांना कसे जाळयात ओढायचे?
एका औद्योगिक घराण्याने त्यांच्या मुलाला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे तर, दुसऱ्या कुटुंबाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सहाय्यक पोलीस आयुक्त मुरलीधर शर्मा यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोन्ही आरोपी प्रेमाचे नाटक करुन महिलांना आपल्या जाळयात ओढायचे नंतर प्रणयाच्या क्षणाचे व्हिडीओ शूटिंग करायचे अशी माहिती पोलिसांनी दिली.

एका आरोपीचा लॅपटॉप फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला आहे. एका फाईलमध्ये १८२ फोल्डर सापडले आहेत. वेगवेगळया महिलांसोबत शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ त्यामध्ये आहेत. २०१३ सालापासूनच्या या क्लिप्स आहेत. मागच्यावर्षी आचारी त्यांच्या कटामध्ये सहभागी झाले. तो महिलांकडे पैशांची मागणी करायचा. पैसे दिले नाहीत तर, व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी द्यायचा असे पोलिसांनी सांगितले.

आधीपासूनच कॅमेरे सेट करुन ठेवयाचे
दोन्ही आरोपी आधी महिलांबरोबर ओळख करायचे. नात्यात विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांना वेगवेगळया ठिकाणी बोलवायचे. तिथे आधीपासूनच शूटिंगसाठी कॅमेरे बसवलेले असायचे. मागच्यावर्षीपासून त्यांनी महिलांकडून पैसे उकळायला सुरुवात केली. त्यांनी एका मुलीकडे पाच लाखाची मागणी केली. मुलीने मागितलेली रक्कम दिल्यानंतर पुन्हा त्यांनी तिच्याकडे १० लाख मागितले. त्यामुळे अखेर तिने सायबर सेलकडे तक्रार नोंदवली. त्यातून या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.