काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणांवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोकलामचा संघर्ष टाळता आला असता. पण त्यांनी फक्त एक घटना म्हणून त्याकडे पाहिले. चिनी सैन्य अजूनही डोकलाममध्ये आहे हे सत्य आहे. डोकलामच्या संघर्षाबद्दल माझ्याकडे संपूर्ण माहिती नाहीय. त्यामुळे मी हा विषय वेगळया पद्धतीने कसा हाताळला असता हे मला सांगता येणार नाही असे राहुल म्हणाले.
पाकिस्तान बरोबर चर्चा करणे कठिण आहे कारण तिथे कुठल्याही एका संस्थेकडे पूर्ण सत्ता नाहीय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही पाकिस्तानबद्दल कुठलीही रणनिती नाही असे राहुल म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयामध्ये पंतप्रधान कार्यालयाची एकाधिकारशाही चालते पण सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री म्हणून पूर्णपणे सक्षम आहेत असे ते म्हणाले. सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यानंतरच भारताला यश मिळते. मागच्या चार वर्षात सत्तेचे मोठया प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे असे ते म्हणाले. १० वर्षाच्या सत्तेनंतर काँग्रेसमध्ये काहीसा अहंकार निर्माण झाला होता. आम्ही त्यातून योग्य तो बोध घेतला आहे असे राहुल म्हणाले.
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ मध्ये जिंकू शकत नाही
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आघाडी झाली तर भाजपा २०१९ साली लोकसभेची निवडणूक जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आणि तशीच आघाडी बिहारमध्ये आकाराला आली तर भाजपाला १२० जागांवर फटका बसेल असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचा मूळ स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अन्य पक्षांनी कधीही भारतातील संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. अरब जगतात मुस्लिम ब्रदरहूडची जी विचारसरणी आहे भारतात आरएसएस सुद्धा त्याच मार्गाने जात आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 4:11 pm