कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. वर्षअखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपाचे सत्तेचे स्वप्न भंग होऊ शकते. सध्याच्या घडीला मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली असून काँग्रेस आणि भाजपाच्या मतांमध्ये १५ टक्क्यांचे अंतर आहे.

आज निवडणूका झाल्यास मध्य प्रदेशात काँग्रेसला ४९ टक्के आणि भाजपाला ३४ टक्के मते मिळू शकतात. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहेत. देशाचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सीएसडीएसने केलेल्या सर्वेक्षणातून हे आकडे समोर आले आहेत.

मध्य प्रदेशच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन काँग्रेसने कमल नाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पक्षाच्या प्रचाराची धुरा संभाळतील. मध्य प्रदेशमध्ये ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मागच्या पंधरावर्षापासून मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. २००४ साली भाजपाने मध्य प्रदेश जिंकले तेव्हापासून आजपर्यंत भाजपाचीच सत्ता आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते.

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याच मुद्यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारला घेरण्याची काँग्रेसची रणनिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या हातून हे राज्य गेल्यास मोदी सरकारसाठी तो मोठा झटका असेल. २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत मागच्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक १६५ आमदार निवडून आले. काँग्रेसला ५८ आणि बसपाला चार जागांवर समाधान मानावे लागले होते.