मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये प्रशासनाने बुलडोझरने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या कृतीविरोधात छिंदवाडा-नागपूर हायवे वर काही काही हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको आंदोलनही केले. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आहे.

महाराष्ट्र भाजपाने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करुन शिवसेना आणि काँग्रसेवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले ‘प्रेम’ दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल भाजपाने विचारला आहे.

प्रशासनाच्या या कृतीविरोधात छिंदवाडा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारने जाणूनबुजून शिवरायांचा पुतळा हटवला असा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. दरम्यान पुतळा बसवण्यापूर्वी कोणतीही आवश्यक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा टि्वट करुन प्रशासनाच्या कृतीविरोधात संताप व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचा गौरव असून, देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला आक्षेप होता तर, सन्मानपूर्वक तुम्ही पुतळा हटवायला हवा होता. पण या सरकारला महापुरुषांचा अपमान करण्यामध्ये गर्व वाटतो” अशा शब्दात शिवराज सिंह चौहान यांनी आपला संताप व्यक्त केला.