दिवाळीच्या फटाक्यातील सुतळी बॉम्ब कानाजवळ फुटल्यामुळे मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात एका २८ वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. सुतळी बॉम्बच्या स्फोटाने कवटीचा काही भाग फुटला. त्यामुळे जागीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या बिछान्याजवळ एका बॉक्समध्ये हा सुतळी बॉम्ब ठेवला होता. त्याच्या स्फोटाने मृत्यू झाला असे फॉरेन्सिक तज्ञांचे मत आहे.

डोक्याजवळ हा सुतळी बॉम्ब फुटल्यामुळे मृत्यू झाला असे वाटते. मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी तपासकर्ते पुरावे गोळा करत आहेत असे गुनाचे एसपी राहुल लोधा यांनी सांगितले. अमित शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पेशाने ते वकील होते. स्फोटाचा आवाज ऐकून अमित शर्मा यांचा लहान भाऊ अंकित सर्वप्रथम त्यांच्या खोलीच्या दिशेने धावला.खोलीमध्ये सर्वत्र धूर झालेला होता. आग विझवण्यासाठी म्हणून अंकित पाण्याने भरलेली बादली घेऊन आला. खबरदारी म्हणून अंकितने अमित शर्मा यांच्या खोलीतून फटाके आणि एलपीजी सिलिंडर बाहेर काढला.

बिछान्यात भावाची अवस्था बघून अंकितला धक्का बसला. कवटीचा भाग फुटलेला होता. भिंतीवर आणि दरवाजावर सर्वत्र रक्ताचे डाग होते. अमितचा मृत्यू झालेला होता असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरुन पॅकेटमधील चार सुतळी बॉम्ब जप्त केले आहेत. अजून शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही. बंद खोलीत सुतळी बॉम्बचा स्फोट कसा झाला ते शोधून काढणे महत्वाचे आहे. पोलिसांकडून या संशयास्पद प्रकरणाची चौकशी सुरु आहे.