नागा पीपल्स फ्रंटने मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. भाजपाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय एनपीएफने जाहीर केला आहे. पक्षाच्या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आम्ही पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला आहे असे एनपीएफचे प्रवक्ते अच्युमबीमो किकॉन यांनी सांगितले.

या निर्णयामुळे ईशान्य भारतातील एका राज्यामध्ये भाजपाच्या सरकार समोरील अडचणी वाढणार आहेत. राज्यातील भाजपा सरकार आमच्या कल्पना आणि सल्ल्यांना किंमत देत नाही ही आमची बऱ्याच दिवसापासूनची तक्रार आहे असे किकॉन म्हणाले. ६० सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत एनपीएफचे फक्त चार आमदार आहेत. भाजपाचे मणिपूरमध्ये २९ आमदार आहेत.