कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांची ग्वाही

यापूर्वीच्या अटकळींना विराम देत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांची अमृतसरमधील एका खासगी हॉटेलमधे भेट घेतली. ४० मिनिटांच्या या भेटीत अमरिंदर यांनी त्रुडो यांच्याकडे खालिस्तान समर्थनाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा भारतातील किंवा इतर कुठल्याही फुटीरवादी चळवळीला कॅनडा पाठिंबा देणार नाही, असे आश्वासन त्रुडो यांनी त्यांना दिले.

स्वतंत्र खालिस्तानच्या चळवळीसाठी प्रचार करणाऱ्या लोकांबाबत मवाळ भूमिका असलेल्या कुणाशीही भेटण्यास आपल्याला रस नसल्याचे सांगून, कॅनडा प्रशासनातील कुणालाही भेटण्याबद्दल अमरिंदर यांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजित सज्जन सिंग यांच्या भारत भेटीदरम्यान अमरिंदर त्यांना भेटले नव्हते. फुटीरवाद आणि काही विशिष्ट घटकांकडून द्वेषातून होणारे गुन्हे यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अमरिंदर यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना केले.

त्यावर, त्रुडो यांनी क्यूबेकमधील फुटीरवादी चळवळीचा दाखला दिला. आयुष्यभर आपण अशा धोक्यांचा सामना केला आहे. हिंसाचाराच्या धोक्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे असून आपण सर्वशक्तीनिशी ते परतवून लावले आहेत असे त्यांनी सांगितले, असे पंजाब सरकारने जारी केलेल्या निवेदनाद्वारे सांगितले.

पंजाबमधील दहशतवादी कारवायांसाठी पैसे आणि शस्त्रे पुरवून द्वेषयुक्त गुन्ह्य़ांत सहभागी झालेल्या, तसेच येथील तरुण व मुलांना कट्टरतावादाकडे वळवणाऱ्या कॅनडातील ‘अ’ श्रेणीतील ९ जणांची यादीही अमरिंदर यांनी टड्रो यांना सोपवली. स्वतंत्र शीख देशाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणाऱ्या लोकांची अनामत ठेवही जप्त झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.