नवी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरीम जामिन मंजूर केला आहे. आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात रॉबर्ट वड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिनाबरोबर वड्रा यांना न्यायालयात एक लाख रुपये भरावे लागणार असून त्यांना ६ फेब्रुवारीला चार वाजता कोर्टात हजर रहाण्यास सांगण्यात आले आहे.

ईडीकडून या आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आपण कायदे पाळतो तसेच आपल्याला चुकीच्या खटल्या गोवले जात आहे त्या आधारावर रॉबर्ट वड्रा यांनी जामीन मागितला होता. लंडनमध्ये मालमत्ता खरेदीच्या व्यवहारात आर्थिक अफरातफर झाल्याचे हे प्रकरण आहे. ही संपत्ती वड्रा यांच्या मालकीची असल्याचे बोलले जाते.

न्यायालयाने वड्रा यांचे सहकारी मनोज अरोरा यांना अटकपूर्व जामिन मंजूर केल्यानंतर वड्रा यांनी जामिनासाठी अर्ज केला. या प्रकरणात मनोज अरोरा सुद्धा सहआरोपी आहे. तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्यानंतर मनोज अरोरा याला ६ फेब्रुवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला.

मनोज अरोराने याआधी राजकीय सूडभावनेतून एनडीए सरकार आपल्यावर हे प्रकरण लादत आहे असा आरोप कोर्टात केला होता. वड्रा यांच्या परदेशातील अघोषित संपत्तीसाठी अरोराने निधीची व्यवस्था केली असा ईडीचा दावा आहे. रॉबर्ट वड्रा प्रियंका गांधी यांचे पती असून नुकतीच प्रियंका यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.