लॉकडाउन लागू होऊन १३ दिवस लोटले आहेत. तरीही देशात करोनाच्या संसर्गाचा जोर कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशातील मृतांचा आकडा चार हजारांच्या वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडाही शंभरच्या पलिकडे गेला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार आवश्यक आरोग्य सामुग्रीचा आढावा घेत असून, जूनपर्यंत भारताला करोनाशी संबंधित आरोग्याची साधन मोठ्या प्रमाणावर लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताला तब्बल दीड कोटी पीपीई (स्वसंरक्षण साहित्य. उदा. मास्क वगैरे), दोन कोटी ७० लाख एन९५ मास्क आणि ५०,००० व्हेटिंलेटरची गरज भासणार आहे.

करोनासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या मूळ साधनांची गरज लागणार असल्याचं समोर आलं. या दिशेनं केंद्र सरकारनं काम करणं सुरू केलं आहे. जूनपर्यंत देशात दीड कोटी पीपीई (स्वसंरक्षण साहित्य. उदा. मास्क वगैरे), दोन कोटी ७० लाख एन९५ मास्क आणि ५०,००० व्हेटिंलेटर लागणार आहे. याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून परदेशातून या वस्तू मागवण्यात येणार आहे. यासंदर्भात निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांची उद्योग, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. ३ एप्रिल रोजी ही बैठक झाली. इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“दीड कोटी पीपीई (स्वसंरक्षण साहित्य. उदा. मास्क वगैरे), दोन कोटी ७० लाख एन९५ मास्क आणि ५०,००० व्हेटिंलेटर जून २०२० पर्यंत लागणार आहे. ते मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,” असं सूत्रांनी सांगितलं. ५० हजार व्हेटिंलेटर लागणार आहे. त्यापैकी १६ हजार व्हेटिलेटर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ३४ हजार व्हेटिंलेटर खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. परदेशातून या वस्तू आयात केल्या जाणार असून, यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचालाही यात सहभागी करून घेण्यात आलं आहे. या बैठकीत पीपीईची मागणी आणि पुरवठा तसेच पुढील ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत लागणाऱ्या साधनांची मागणी याविषयी स्पष्टता असावी, अशी भूमिका प्रतिनिधी बैठकीत घेतली. गुंतवणूक करणे उद्योगांसाठी जिकिरीचं असल्यानं यात स्पष्टता असणं गरजेचं असल्याचं प्रतिनिधींनी म्हटलं आहे.